चिपळूण : चिपळुणच्या दोन सायकलपटूंचा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

banner 468x60

चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसांमध्ये केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार व फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीर ते कन्याकुमारी अशी ४००० किमी हून अधिक लांब अंतराची सायकल मोहीम आखण्यात आली होती.

banner 728x90

देशभरातून १५० सायकलस्वारांची कठोर निकष लावून निवड करण्यात आली होती. चिपळूण सायकलिंग क्लबचे अहमद शेख आणि राघव खर्चे हे दोन सायकलस्वार यामधे निवडले गेले होते. १ नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथून झेंडा दाखवून मोहिमेला सुरुवात झाली. जम्मू, दिल्ली, जयपूर, उदयपूर, गोध्रा मार्गे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत प्रवास करीत सर्व सायकलस्वारांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

यानंतर धुळे सोलापूर मार्गे बंगलोर व पुढे कन्याकुमारी येथे पोचल्यानंतर मोहीमेची समाप्ती झाली. कन्याकुमारी येथे पोहोचल्यावर विवेकानंद केंद्र परिसरात सर्व सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. एकूण सोळा दिवसांत दररोज २५० हून अधिक किलोमीटरचा प्रवास करीत नऊ राज्यांमधून ४००० हून अधिक किलोमीटरचा प्रवास सर्व सायकलपटूंनी केला. थंडी, वारा, कडक उन्हाचा सामना करताना अनेकांना सायकलमधील बिघाडांचा पण सामना करावा लागला.

चिपळूण सायकलिंग क्लबच्या अहमद शेख यांनी किमान २६ जणांना पंक्चर काढून दिले तर शेख आणि राघव खर्चे यांनी अनेक रायडर्सना मौलिक सूचना देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले. चिपळूण सायकलिंग क्लबच्या या दोन्ही धुरंधर सदस्यांमुळेच आपली राईड पूर्ण होऊ शकली असे अनेक रायडर्सनी अगत्याने नमूद केले. चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य सातत्याने नवनवीन धाडसी उपक्रम पार पाडत असतात. अनेक नवनवीन विक्रम क्लबच्या सदस्यांच्या नावे कोरले गेलेले आहेत.

अहमद शेख आणि राघव खर्चे यांनी यापूर्वी एस आर, १२०० किमी एल आर एम असे विक्रम केलेले असून अहमद शेख यांनी यासोबतच ट्रिपल एस आर, एव्हरेस्टिंग, डेक्कन क्लिफहँगर रेस (रॅम क्वालिफायर), टायगरमॅन स्पर्धां, लहानमोठ्या सायकल रेसमधे आपले नाव कोरले आहे. या दोन्ही सायकलपटूंच्या नूतन यशाबद्दल सर्व सायकलिंग ग्रुप्स तसेच समाजाच्या सर्व थरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर दोन्ही सायकलपटूंचे नुकतेच चिपळूण येथे आगमन झाले असून फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *