गुहागर : ओडिशातील कासव अंडी घालण्यासाठी गुहागरात

banner 468x60

ओडिशाच्या किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेले ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची नोंद वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे झाली आहे.

banner 728x90

त्या कासवाला लावलेल्या ‘फ्लिपर टॅग’मुळे ही माहिती पुढे आली. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अंडी घालणारे मादी कासव देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आल्याची ही पहिलीच नोंद आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अधिवास करणाऱ्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या संख्येविषयी अपेक्षित माहिती मिळत नव्हती; मात्र, भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मादी कासवांना ‘सॅटेलाईट टॅग’ लावले आणि त्या विषयीचे कोडे उलगडले. ओडिशात सॅटेलाईट टॅग लावलेल्या कासवाच्या माद्या पश्चिम सागरी परिक्षेत्रातील लक्षद्वीपपर्यंत पोहोचल्या होत्या तसेच काही कासवाच्या माद्या श्रीलंकेपर्यंत पोचल्याचेही पुढे आले.

गुहागर किनाऱ्यावर ‘सॅटेलाईट टॅग’ केलेल्या मादी कासवाने पूर्व सागरी परिक्षेत्रापर्यंत प्रवास केला. या दोन्ही घटनांमध्ये कासवाच्या माद्या प्रवास करून पोहोचलेल्या ठिकाणी अंडी घालतात का या संबंधीचा पुरावा पहिल्या प्रयोगामधून संशोधकांच्या हाती लागला नव्हता; मात्र, दुसऱ्या टप्प्यात फ्लिपर टॅगिंगमुळे ते कोडेदेखील उलगडले आहे.

२०२१ साली ओडिशात अंडी घातलेल्या मादीने जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर येऊन अंडी घातल्याची माहिती कांदळवन कक्षाकडून मिळाली आहे. गुहागर येथील बाजारपेठ भागातील भोसले गल्लीजवळ २७ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास एक मादी कासव अंडी घालण्यास आली. ही मादी अंडी घालून समुद्रात परत जाण्यासाठी निघाली तेव्हा बीच मॅनेजर शार्दुल तोडणकर आणि संजय भोसले यांना तिच्या पुढच्या परांना लावलेला फ्लिपर टॅग दिसला.

कासवाच्या एका परावर ०३२३३ क्रमांक आणि दुसऱ्या परावर ०३२३४ क्रमांकाचा टॅग होता तसेच, मागच्या बाजूला ‘झेडएसआय’ म्हणजेच ‘झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ असे नाव कोरलेले होते. ही सर्व माहिती कांदळवन कक्षाकडून ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. सुरेश कुमार यांना पाठवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *