दापोली : सायली नागेच्या मृत्यूला जबाबदार कोण ? आई आणि बाळ कधी येणार? “ती” च्या 3 वर्षाच्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर द्यायची प्रशासनाची आणि राजकीयांची हिंमत आहे का ?

दापोली : सायली नागेच्या मृत्यूला जबाबदार कोण ? आई आणि बाळ कधी येणार? "ति" च्या 3 वर्षाच्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर द्यायची प्रशासनाची आणि राजकीयांची हिंमत आहे का ?

banner 468x60

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर यायला एका गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याची वाट पाहावी लागतेय.

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयांमधील ढिसाळ कारभाराचा फटका दापोलीसारख्या अनेक गावांना बसू लागलाय. ज्या आशेने उपजिल्हा रुग्णालयांकडे पाहिलं जातं ती आशा मावळलीय का असा प्रश्न निर्माण झालाय.

या मुर्दाड प्रशासन आणि नेत्यांना व्यवस्थेला जागं करण्याची वेळ आली आहे. दापोलीतील अनेक गावातून येणाऱ्या रुग्णांना दापोली उपजिल्हा रुग्णालय आधार आहे. दुःखाचा डोंगर काय आहे हे मोलमजुरी करून जगणाऱ्या नागे या कुटुंबीयांना विचारा.

2024 मध्ये आपण जगत असताना एका तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या 28 वर्षीय महिलेचा गरोदरपणात मृत्यू होतो. नऊ महिन्यांची गरोदर असलेली सायली आणि तिच्या पोटातल्या बाळाला या व्यवस्थेने मारलं आहे.

खासदार सुनिल तटकरे यांच्याजवळ संपर्क केला असता त्यांनी म्हटलं

“ तुम्ही सांगितल्यानंतर हा प्रकार आम्ह्याला समजलं आहे. मी तातडीने माहिती घेतो आणि या प्रकाराबाबत कारवाईचे आदेश देतो. जी पदे रिक्त आहेत त्याबद्दल देखील विचारणा करतो.”

असं खासदार सुनिल तटकरे यांनी म्हटलंय.

कोकण कट्टाने दापोलीचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे नेते केदार साठे यांच्याजवळ संपर्क केला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही आम्ही याबाबत त्यांना पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करू

कोकण कट्टाने याबाबत दापोलीचे मेडिकल ऑफिसर डॉ महेश भागवत यांच्याजवळ संपर्क केला

“सायली नागे यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले आहेत. त्यांना दोन दिवसापासून सर्दी खोकला होता. यामुळे तब्बेत त्यांची खूप सिरयस होती. आमच्याकडे MD मेडिसिन डॉक्टर नाहीत आम्ही त्यावेळी प्रायव्हेट डॉक्टर बोलावले आणि उपचार पण सुरु केले. सायली यांचा मृत्यू कश्यामुळे झाला याचं नेमकं कारण अहवाल आल्यानंतर समजेल”

असं मेडिकल ऑफिसर डॉ महेश भागवत यांनी म्हटलं.

याबाबत कोकण कट्टाने ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्याजवळ संपर्क केला

साधे उपचार दापोलीत मिळत नाही. दापोली उपजिल्हा रूग्णालयातून सीजरसाठी बाहेर पाठवलं जातं. इथल्या प्रतिनिधीनी नारळ फोडले पण डॉक्टर कुठे आहेत. सायलीचा व्यवस्थेने जीव घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केलाय. येत्या 15 दिवसात याबाबत रीतसर चौकशी झाली नाही तर आपण या रूग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक वर्षे या उपजिल्हा रूग्णालयात पूर्ण क्षमतेने वैद्यकीय अधिकारी नाहीत या गंभीर बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.”

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांचं म्हणणं आहे.

दापोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांची पदे गेली अनेक वर्ष रिक्त आहेत. रत्नागिरी जिल्हा रूग्णालयानंतर दुसरा नंबरचे रुग्णालय म्हणून दापोली उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जातं मात्र उपचाराच्या नावाने वानवा आहे.

गरोदरपणात सायलीचे दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सोबतच दापोलीतील एका खासगी डॉक्टरकडेही उपचार घेत होती अशी माहिती आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी सायलीच्या कुटुंबाने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात तिची तपासणी करून घेतली होती आणि या तपासणीनंतर सायलीला काही अडचणी आहेत हे तपासणीनंतर सांगितलं गेलं नव्हतं सायलीला मार्गदर्शन करण्यात आलं नव्हतं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

सायलीची 12 जून डिलिव्हरीची तारीख आहे , तुम्ही निश्चिंत राहा, असं सांगण्यात आलं होतं. पण पोटात दुखायला लागल्यामुळे सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळी बाळ सुस्थितीत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, यामुळे कुटुंबियांनी दोघांचाही जीव वाचवण्यासाठी सिझरची तयारीही सुरू केली होती.

आजच तिचं सिझर केलं जाणार होतं, पण सिझर होण्यापूर्वीच तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय नंतरची सर्वात जास्त ओपीडी ही दापोली उपजिल्हा रुग्णालयाची असुन अजूनही हा विषय राजकीय नेत्यांनी गांभीर्याने घेतला नाहीय. सध्या दापोली उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बी.एम.एस डॉक्टरांकडे आहे.

दापोलीत 7 वैद्यकीय अधिकारी आणि 1 वैद्यकीय अधिक्षक अशी 8 पदे आहेत. यापैकी 2 पदे (MBBS) पदे भरली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. दरम्यान यामध्ये एकही तज्ञ पद नाही. दापोलीत सध्या स्त्री रोग तज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, सर्जन, बालरोगतज्ज्ञ या तज्ञ डॉक्टरांची गरज आहे.

मात्र सध्याच्या घडीला ही पदे गेल्या कित्येक वर्ष रिक्त आहेत. सायली नागे यांच्या मृत्यूमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलाय मात्र नेत्यांचं आणि वरिष्ठ कधी प्रकाश टाकणार याचं उत्तर नसून अजून एका सायलीची वाट पाहावी लागेल का हा प्रश्न आहे.

या मुर्दाड प्रशासन आणि नेत्यांना व्यवस्थेला जागं करण्याची वेळ आली आहे. पुढची सायली तुमच्या आमच्या घरातीलही ही असावी यासाठी पुन्हा एकदा मुर्दाड व्यवस्थेला जागं करण्याची वेळ आलीय.

banner 728x90

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *