हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला देण्यासाठी पंधरा हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कोतवडे (ता. रत्नागिरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक शैलेश आत्माराम रेवाळे, (वय ३८ वर्षे) याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
त्याच्याकडून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) रोजी करण्यात आली.
तक्रारदार याच्या मालकाच्या हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला मिळविण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व या कामासाठीची प्रक्रिया पूर्ण करून नाहरकत दाखला देण्यासाठी शैलेश रेवाळे याने २६ आॅक्टोबर २०२३ रोजी पंधरा हजार रूपयांची मागणी केली.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडून मंगळवारी सापळा रचण्यात आला. या जाळ्यात आरोग्य सहायक शैलेश रेवाळे अलगद अडकला.
पंचासमोर पंधरा हजार रूपयांची लाच घेताना रेवाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
याप्रकरणी या विभागाचे पोलिस निरिक्षक शहानवाज मुल्ला तपासी अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखालील पथकाने ही कामगिरी केली.
या पथकात पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडे संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. – सुशांत चव्हाण, पोलिस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*