दापोली : 70 जिवंत गावठी बॉम्ब जप्त; मोठा अनर्थ टळला, आरोपी अटकेत

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात रत्नागिरी पोलीस दलाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले असून, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या तरुणास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांचा साठा, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक
. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सतर्क राहून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात नियमित पेट्रोलिंग करत होते.

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२५ वाजण्याच्या सुमारास, खेड–मंडणगड मार्गावरील मौजे मुगीज परिसरात संशयास्पद हालचाली करणारा एक इसम पथकाच्या निदर्शनास आला. पथकाने तत्काळ त्याला थांबवून चौकशी केली असता तो घाबरलेला दिसून आला. संशय बळावल्याने त्याची व वाहनाची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान आरोपीकडून ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे स्फोटक पदार्थ अत्यंत धोकादायक असून सार्वजनिक सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करू शकणारे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५/२०२६ अन्वये भारतीय स्फोटक कायदा १९०८ चे कलम ५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून, या स्फोटकांचा वापर नेमका कुठे व कोणासाठी होणार होता, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

या कारवाईमुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बेकायदेशीर स्फोटक पदार्थ बाळगणे, वाहतूक करणे किंवा साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना पोलीस दलाकडून अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रत्नागिरी पोलीस दलामार्फत देण्यात आला आहे.

तसेच, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती, हालचाल अथवा माहिती आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक
. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक . बी.बी. महामुनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.उनि. प्रशांत बोरकर, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. योगेश नार्वेकर, पो.हवा. दिपटराज पाटील, पो.हवा. सत्यजित दरेकर व चा.पोशी. अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *