महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता भास्करराव निवृत्ती पाटील यांची बनावट सही आणि नावाचा वापर करून, त्यांच्याच नावाने वरिष्ठांकडे खोटा माफीनामा व तक्रार अर्ज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भास्करराव पाटील (वय ५४) हे रत्नागिरी एमआयडीसीमध्ये उपअभियंता (स्थापत्य) म्हणून कार्यरत आहेत. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला.
अज्ञात आरोपीने पाटील यांच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून एक बनावट अर्ज तयार केला. हा अर्ज एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला. संबंधित बनावट अर्जात फिर्यादी पाटील यांच्याकडून खालील बाबींची कबुली दिल्याचा बनाव करण्यात आला होता. पदोन्नती मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला. राजकीय दबावाचा वापर करून स्वतःविरुद्धच्या चौकशा रोखल्या. शासकीय नियमांचे उल्लंघन करून रत्नागिरी आणि पुणे (विमाननगर) येथे भूखंड लाटले. बदली टाळण्यासाठी वरिष्ठांवर दबाव टाकला.
या सर्व कृत्याबद्दल मी ‘दिलगिरी’ व्यक्त करतो, असा मजकूर त्या अर्जात होता.
आपल्या नावाचा वापर करून आपली बदनामी केली जात असल्याचे लक्षात येताच, भास्करराव पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा गैरवापर करून आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी हे बनावटीकरण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रत्नागिरी शहर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३६(२) आणि ३३६(४) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १७/२०२६ नुसार नोंदवला आहे. हा खोटी सही करणारा आणि बनावट अर्ज पाठवणारा ‘अज्ञात’ मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













