दापोली : शेतकऱ्याच्या शेतातील 19 खैर झाडांची कत्तल; 8 ते 9 लाखांचे नुकसान

banner 468x60

दापोली तालुक्यातील महाळुंगे (देवधरेवाडी) येथील शेतकऱ्याच्या शेतातील खैर झाडांची बेकायदेशीर कत्तल करून ती चोरीला नेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

banner 728x90


महाळुंगे (देवधरेवाडी) येथील शेतकरी हरिश्चंद्र गणपत राणे यांच्या मालकीची गट क्रमांक ११० ही जमीन असून त्यामध्ये खैर व इतर झाडांची लागवड आहे. दिनांक २२ डिसेंबर रोजी शेताची पाहणी केली असता, दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी सुमारे १९ मोठी खैराची झाडे तोडून चोरीला नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


या प्रकरणात गावातील संजय सखाराम देवघरे व त्यांचा मुलगा श्रवण संजय देवघरे, तसेच खेर्डी पानवाडी येथील शैलेश नारायण जोशी व रूपेश नारायण जोशी यांनी संगनमत करून ही कत्तल केल्याचा आरोप आहे. तोडलेली खैराची झाडे महिंद्रा पिकअप वाहनातून नेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता, संशयितांनी मारहाणीची धमकी दिली, शिवीगाळ केली व जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे राणे कुटुंब भयभीत झाले असून त्यांचे अंदाजे ८ ते ९ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून खैर झाडांची चोरी, बेकायदेशीर कत्तल व धमकी या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *