रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील महत्त्वाकांक्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे ठरलेले टप्पे वेळेत पूर्ण न केल्याने पतन विभागाने संबंधित ठेकेदाराला १ कोटी ८८ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. ठेकेदाराने उशिरा काम सुरू केले आणि प्रत्येक टप्प्यात वेळकाढूपणा केल्यामुळे पतन विभागाने हा दणका दिला आहे.
सध्या काम संथ गतीने सुरू असल्यामुळे कामाची गती वाढवण्यासाठी ठेकेदाराला पतन विभागस्तरावरून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. १६२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मिऱ्या येथील बहुप्रतिक्षित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण १२०० मीटरच्या कामापैकी ९०० मीटरचे काम सध्या सुरू आहे. समुद्रातील खालचा दगडांचा थर टाकून झाला आहे, असे सांगण्यात येत आहे.
या बंधाऱ्याबाबत स्थानिकांच्या काही तक्रारी होत्या, कारण हा बंधारा त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर होता आणि नगर परिषदेचा एक रस्ता देखील यात जात होता. स्थानिकांच्या तक्रारीचा विचार करून, आता हा बंधारा किनाऱ्यापासून पुढे ४० फूट समुद्रातून घालण्यात येत आहे. यामुळे नगर परिषदेचा रस्ता होणार असून, स्थानिकांना दिलासा मिळाला आहे व त्यांचा प्रश्न सुटला आहे.
दरम्यान, मिऱ्या किनाऱ्यावर गेले अनेक महिने अडकलेले ‘बसरा स्टार’ हे जहाज सुमारे ३०० मीटरचे काम रखडण्यास कारणीभूत ठरले होते. याबाबत पतन विभागाने मेरिटाईम बोर्डाला पत्र देऊन जहाज काढण्यास सांगितले आहे आणि त्याचे काम आता सुरू झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













