दापोली : दापोली भाजपचा “ते” पत्र ‘कोकण कट्टा न्यूजच्या’ हाती, नेमकं पत्रात काय आहे पाहा

banner 468x60

ऐन निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये युतीत बिघाडी झाली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदमांविरोधात दापोली भाजप आक्रमक झाली असून दापोलीतील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह दापोलीतील 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. खेड नगरपरिषदेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर झाली आणि दापोली भाजप पदाधिकाऱ्यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे.

banner 728x90 banner 728x90
Screenshot

कोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी योगेश कदम यांच्या जागा वाटप फॉर्म्युल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पत्राद्वारे वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. ३८ पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

Screenshot

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना पत्र लिहून पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला.
पत्रात नेमकं काय आहे पाहा

Screenshot

प्रति,

मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई.

मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश.

मा. आ. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई.

मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेब, संपर्क मंत्री, रत्नागिरी जिल्हा.

मा. श्री. शैलेन्द्रजी दळवी, विभाग संघटन मंत्री

मा. श्री. सतीशजी मोरे, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी उत्तर.

विषय – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खेड नगर परिषदेत झालेल्या युतीतील जागा वाटपात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायामुळे रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील २६३ दापोली विधानसभेत राजकीय अन्याय व असंतोष होत असलेबाबत….

महोदय,

उपरोक्त विषयान्वये, आपले नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांचे उपस्थितीत दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाशः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला गेला. यात सर्व नेते मंडळींनी पक्ष वाढीसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे मा. देवेंद्रजींनी सांगितले.

महायुती अथवा युतीच्या वाटाघाटी सरू झाल्या रत्नागिरी उत्तर जिल्ह्यात खेड नगर परिषद सातत्याने तीन वेळा ताब्यात ठेवणाऱ्या माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला. नगराध्यक्षासहित खेड नगर परिषद पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या बळावर येण्याची स्थिती व वातावरण निर्माण झाले आहे. आम्हा कार्यकर्त्यांचा महायुती अथवा युती दोघांनाही विरोध नाही.

माजी आमदार श्री. सूर्यकांतजी दळवी यांची खेड नगरपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. खेड शहरात बैठका झाल्या, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या, मात्र आम्हा कोणाही पदाधिकऱ्यांना माहिती नसताना व कोणतीही कल्पना न देता जागा वाटप झाले. त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सन्मानाने युती आम्हा सर्वांनाच मान्य आहे. मात्र खेड नगरपरिषद आपण स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना आपल्याला केवळ तीनच जागा मिळणे हे संघटना म्हणून अत्यंत चुकीचे आहे. रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील दापोली विधानसभेत मोठा राजकीय असमतोल निर्माण झाला आहे व त्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

युतीच्या वाटाघाटी मुंबईत होत असताना स्थानिक आमदार व मंत्री श्री. योगेश कदम हे माजी आमदार श्री. सूर्यकांतजी दळवी व श्री. वैभवजी खेडेकर यांचे विरोधात मिडिया समोर आपमानजनक बोलत होते हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे. शिवसेनेसाठी एक न्याय मात्र भाजपाने तडजोड करणे हे समीकरण कार्यकर्ते किती दिवस सहन करणार? सातत्याने भाजपवर कुरघोडी करण्याचे षडयंत्र शिंदे गटाकडून होत असते. ” केंद्रात व राज्यात सत्ता तुमची आणि भांडी घासा आमची अशाप्रकारच्या घोषणा शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावात देऊन भाजप कार्यकर्त्यांना हिणवत असतात.

स्थानिक कार्यकर्त्यांना कोणतीही कल्पना नसताना तसेच याविषयाची चौकशी जिल्हाध्यक्ष श्री. सतिशजी मोरे यांचेकडे केल्यानंतर त्यांनाही योग्य ती कल्पना नसणे हेही अत्यंत धक्कादायक आहे.

या सर्व निर्णयांचा भविष्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जागा वाटपावरही परिणाम होणार आहे. कित्येक वर्षे पक्षाचा आमदार नसतानाही आजपर्यंत अनेक संघर्ष करत पक्ष टिकवला, तो जोमाने वाढवला आणि आज सत्ता असताना व पक्ष वाढीसाठी सुगीचा काळ असतानाही अशाच संघर्षांना सामोरे जावयाचे असेल तर इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरण्यासारखेच आहे. तरी आपण या सर्व घडामोडींचा विचार करता खेड नगरपरिषद निवडणुकीत योग्य तो सन्मानपूर्वक निर्णय घ्यावा तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक पदाधिकऱ्यांची भूमिका समजावून घ्यावी. स्थानिक आमदार व मंत्री श्री. योगेश कदम यांचे आपल्या पदाधिकऱ्यांविरोधातील मिडियावरील बोलणे तातडीने थांबवावे. त्याचप्रमाणे जागा वाटप हे न्याय्य व सन्मानजनक व्हावे.

हे सर्व तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या खच्चीकरनामुळे त्वरित राजीनामा देऊन घरी बसण्याची वेळ येईल याची नोंद घ्यावी. सदारचा खटाटोप हा पक्ष वाढवण्यासाठी व वाचवण्यासाठीच आहे.

धन्यवाद !

आपलेच, पदाधिकारी व कार्यकर्ते, २६३ दापोली विधानसभा भारतीय जनता पार्टी

असं पत्रात म्हटलं आहे मात्र मंत्री योगेश कदम यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *