मोठ्या परताव्याचं स्वप्न दाखवून हजारो गुंतवणूकदारांना आणि शेकडो कर्मचाऱ्यांना भुरळ घालणाऱ्या ‘टीडब्ल्यूजे’ (TWJ) कंपनीचा मुखवटा आता गळून पडला आहे.
गुंतवणुकीवर 3 ते 7 टक्के प्रतिमाह व्याज देण्याचे आमीष दाखवून राज्यात टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांकडून करोंडोची गुंतवणूक केली. मात्र, अलिकडच्या काही काळात गुंतवणूकदारांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. टीडब्ल्यूजेच्या चिपळूण शाखेला भेट देत तेथे पंचनामा करण्यात आला. इंटक कामगार संघटनेच्या मालकीची ही इमारत असून त्या जागेत भाड्याने टीडब्ल्यूजेचे कार्यालय चालविले जात होते.
या कार्यालयाला कार्पोरेट लूक दिला होता. ठेवीदारांचा परतावा व कर्मचार्यांचे पगार थकल्याचे लक्षात येताच इंटक संघटनेने महिनाभरापूर्वीच कार्यालयास टाळे ठोकले होते.
आता चिपळुणातील पंचनाम्यातून पोलिसांच्या हातात कोणती माहिती येते हे महत्त्वपूर्ण असून याचा उलगडा झालेला नाही.
यवतमाळ येथे टीडब्ल्यूजे कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडे देण्यात आला आहे. या शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 30) चिपळूणमध्ये भेट देऊन गुहागर बायपास येथील टीडब्ल्यूजेच्या चिपळूण शाखेची पाहणी केली व पंचनामा केला. त्यामुळे आता या तपासाला वेग आला आहे.
टीडब्ल्यूजेचे सीएमडी समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, चिपळूण व्यवस्थापक सिद्धेश कदम, पार्टनर संकेश घाग या चौघांविरोधात 19 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कामथे येथील प्रतिक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार टीडब्ल्यूजेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता चौकशी सुरू केली असून ठिकठिकाणी चौकशी सुरु आहे व टीडब्ल्यूजेच्या शाखा पोलिसांनी लक्ष्य केल्या आहेत.
गुंतवणूकदारांना 1 लाखावर प्रतिमाह 3 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजाचे आमीष दाखविण्यात आले. याला भुलून अनेकांनी या कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली. सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, शिक्षक, व्यापारी तर काही उद्योजकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले. 2018 पासून ही कंपनी सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला, पण गेले सहा महिने गुंतवणूकदारांच्या खात्यात व्याज मिळणे बंद झाले आहे. शिवाय कर्मचार्यांचे वेतनही रखडले आहे.
त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. काहींनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ चिपळूणमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आता चौकशीचा फास आवळला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













