रत्नागिरीत सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स बंद करून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल ₹८७,६४२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाचणे येथील श्रीरामनगर भागात राहणारे प्रसाद रघुनाथ यादव (वय ३१) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ते टीआरपी परिसरातील यामाहा शोरूममध्ये काम करत असताना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातील अधिकारी असल्याचे सांगून यादव यांच्या क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्सबाबत माहिती दिली.
या इन्शुरन्सची सेवा बंद (डिअॅक्टीवेट) करण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल, असे सांगून आरोपीने यादव यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आणि ‘SBI CREDIT CARD.apk’ नावाची फाईल पाठवली. या लिंकवर क्लिक करून दिलेल्या सूचनांनुसार वैयक्तिक तसेच बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आले. बँकेचा प्रतिनिधी असल्याचा विश्वास बसल्याने यादव यांनी संबंधित माहिती भरली.
मात्र, ही माहिती भरल्यानंतर काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एकूण ₹८७,६४२ रुपये परस्पर वळवण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांकधारकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा (रजिस्टर क्रमांक ८४/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद APK फाईल्स डाउनलोड करू नयेत तसेच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













