लोटे येथे उभ्या राहत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत दलवाई यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रदूषणामुळे इटलीमधील मिटेनी ही कंपनी बंद पाडण्यात आली. या कंपनीची संपूर्ण यंत्रसामुग्री जशीच्या तशी कोकणात आणण्यात आली. ही यंत्रसामुग्री लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केली आहे. मिटेनी कंपनीचे माजी डायरेक्टर असलेले अँटोनिया नॉरडेनी यांचा लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
कायमचे रसायन (पीफास) आरोग्यासाठी घातक आहे. ते केमिकल मानवी रक्तात गेल्यास कॅन्सर, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे तसेच हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय प्रजनन क्षमतेवरही त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असताना या कंपनीला परवानगी देताना या सर्व बाबींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप दरवाई यांनी केला. तसेच हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, जनतेच्या आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षीय मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदुलकर, संकेत साळवी, महादेव चव्हाण, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













