खेड : कार-दुचाकी अपघातात तिघे युवक जखमी

banner 468x60

मुंबई–गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील काशिमठ नजीक काळकाई हॉटेलसमोर शनिवारी (दि. ७ मार्च) दुपारी कार आणि दुचाकीच्या अपघातात तिघे युवक जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.


banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी सुमारे ३.४८ वाजण्याच्या सुमारास घडला. विन्हेरे येथून खेडच्या दिशेने एक दुचाकी येत होती. त्याचवेळी महामार्गावरून जात असलेल्या एका कार चालकाने अचानक डिव्हायडर क्रॉस करून वळण घेण्याचा प्रयत्न केला. कार चालकाच्या या अचानक वळणामुळे समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट कारवर जाऊन धडकली.

या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघे युवक रस्त्यावर फेकले गेले आणि ते जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात चैतन्य रमेश पवार (वय २५), किरण गणेश पवार (वय २३) आणि संकेत अनंत पवार (वय २४) हे तिघे युवक जखमी झाले असून ते सर्व विन्हेरे येथील रहिवासी आहेत. सध्या तिघांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *