मंडणगड : बसस्थानकातील शौचालयाची दयनीय अवस्था, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील मुख्य बसस्थानक परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत दुरवस्थेत असून त्यातून पसरत असलेला तीव्र दुर्गंधीचा त्रास नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. शौचालयाच्या टाकीचे झाकण पूर्णपणे उघडे असून, घाण साचलेली स्थिती स्पष्टपणे दिसत आहे. या अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.


स्थानक परिसरातून दररोज प्रवासी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असताना अशा प्रकारची परिस्थिती गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण मानली जात आहे. पावसाळ्यात या ठिकाणी माशांचा प्रादुर्भाव व संसर्गजन्य रोगांची शक्यता वाढणार असल्याची नागरिकांची चिंता व्यक्त होत आहे.

banner 728x90


याबाबत अनेकांनी बसस्थानकातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्याचा नागरिकांचा दावा आहे. मात्र, “संपूर्ण परिस्थिती बिघडलेली असूनही डेपो मॅनेजर गप्प का बसले आहेत?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शौचालयाची स्वच्छता, दुरुस्ती आणि टाकीचे नीट नियोजन ही मूलभूत जबाबदारी असून त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.


नागरिकांनी तातडीने शौचालयाची स्थिती सुधारण्याची, टाकी बंद करण्याची, नियमित स्वच्छतेची आणि परिसर निर्जंतुक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
स्थानक परिसरातील ही अस्वच्छता फक्त सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेवर थेट आघात करत असल्यामुळे तात्काळ कारवाईची गरज स्पष्टपणे जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *