संगमेश्वर : फुणगूस येथे शालेय सहल बस अपघात

banner 468x60

गणपतीपुळे येथून महाड येथे बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला फुणगूस येथील मुख्य रस्त्यावर भोसलेवाडी परिसरात आज (मंगळवारी) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

banner 728x90 banner 728x90

मात्र सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून केवळ एक-दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, धारूर (जिल्हा बीड) येथील ही सहल होती. MH 12 / HB 0114 क्रमांकाच्या या बसमध्ये इयत्ता चौथी ते आठवीतील 35 विद्यार्थी, 3 शिक्षक व 2 मावश्या असे एकूण 41 प्रवासी होते. बस चालक कृष्णा शिरीषराव चाटे हे बस चालवत होते. फुणगूस येथे बस आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली.

या अपघातात साक्षी गायके (१४), अरुणा मैद (३६), सृष्टी गोरे (९), मयुरी विलास पवार (१४), गणेश रमेश गोरे (१४), प्रीतम देवराव रोडे (१५), अजय सतीश नागस (९), विठ्ठल नानोबा हुलगे (१३), रितेश विलास बाडये (९), राखू विठ्ठल घोडके (३०), सारिका बालाजी कवके (३४), ओंकार सुधीर गिरी (१२) आणि प्रताप प्रकाश फड (१२) यांना किरकोळ दुःखापत झालीअसून फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले .

सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत.अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत थुळवाडी व परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला. फटकरे गुरुजी, थूळ गुरुजी तसेच थुळवाडीतील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली. घाबरलेल्या मुलांना धीर देणे, त्यांची जेवण-पाण्याची सोय करणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे असे मायेचे वातावरण निर्माण करण्यात आले.

याशिवाय फुणगूस गावचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली, तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था सेवानिवृत्त शिक्षक विजय फटकरे यांनी केली. गरजेची प्रत्येक मदत स्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केली. अनोळखी असूनही या मुलांना आपलेच समजून मदत करणारी माणुसकी पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *