संगमेश्वर : रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेला क्रेनची धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

banner 468x60

रस्त्यालगत दुचाकीच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने धडक दिल्याने महिला चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंबनजीक असलेल्या (ताम्हाने हद्दीतील) स्वामी समर्थ मठ येथे घडली.

banner 728x90

सावित्री राजाराम सावंत (वय ६५, रा. कनकाडी-एरंडेवाडी, संगमेश्वर) असे महिलेचे नाव आहे. जयेंद्र गजानन सावंत (रा. कनकाडी-एरंडेवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. जयेंद्र सावंत व सावित्री सावंत या दुचाकीवरून (एमएच ०८, एन ०३८८) रविवारी सकाळी बुरंबी येथील मुलीकडे जात होत्या.

कोसुंबनजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे जयेंद्र सावंत याने दुचाकी थांबविली होती. यावेळी सावित्री सावंत या रस्त्यालगत दुचाकीच्या बाजूला उभ्या होत्या. यावेळी एहम्मद अली रझा (२७, रा. उत्तर प्रदेश) हा क्रेन घेऊन (एमएच ४३, बी १३४५) देवरुखहून-संगमेश्वरच्या दिशेने निघाला होता. त्याचे क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला तसेच सावित्री सावंत यांना क्रेनची धडक बसली.

यात सावित्री या क्रेनखाली चिरडल्या गेल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जयेंद्र सावंत यांच्या पायालाही दुखापत झाली आहे.

अपघाताचा देवरुख पोलिसांनी पंचनामा केला असून, एहमद रझा याच्यावर देवरुख पोलिस स्थानकात बीएनएस १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१, मोटार वाहन कायदा कलम १८४, ३(१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *