संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सापडला.
ही हत्या की आत्महत्या, याचे कोडे मात्र उलगडलेले नाही. तसेच या प्रकरणात संगमेश्वर पोलिसांवर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या मृत तरुणाचे नाव प्रशांत बुद्धम पवार असे आहे.
संगमेश्वर पोलिस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धामणी येथील प्रशांत पवार दि. २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता घरातून निघून गेला होता. त्याने आपण अहमदाबाद येथे जात असल्याचे सांगितले होते.
बरेच दिवस झाले तरी तो घरी न आल्याने व त्या काळात कोणताही संपर्क न झाल्याने त्याच्या घरच्यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. बेपत्ता प्रशांतचा शोध नातेवाईकांकडून सतत सुरू होता.
बुधवारी सायंकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील धामणी बडदवाडी नदी पात्राजवळच्या एका झुडपात कुजलेल्या स्थितीत प्रशांतचा मृतदेह दिसला. हा सर्व प्रकार गावात पसरताच एकच खळबळ उडाली. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पोलिसांनी या प्रकाराची नोंद केली असून, याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
नातेवाइकांसह कुटुंबियांना संशय येतो मात्र पोलिसांना का येत नाही?
प्रशांत हा शांत स्वभावाचा होता. आणि तो उत्तम ड्राइवर देखील होता. यापूर्वी देखील प्रशांतला त्याच्याच चुलत भावाकडून दगड, कोयत्याने मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या होत्या, संबंधीत चुलत भावावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. प्रशांतचे प्रकरण संगमेश्वर पोलिसांनी आधीच का गांभीर्याने घेतले नाही? २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता प्रशांत घरातून निघाला मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
कुटुंबियांनी प्रशांत बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबविली का? तेथील बीट अंमलदार, पोलीस निरीक्षक यांनी कोणता तपास केला? घरी सांगून सकाळच कामानिमित्त निघालेल्या प्रशांतचा काही दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तिथेच असणाऱ्या कोरड्या नदी पात्रातील झाडाझुडपात मिळतो यातून घातपाताचा नातेवाइकांसह कुटुंबियांना संशय येतो मात्र पोलिसांना कोणताही संशय येत नाही?
याबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशांतने दिलेल्या आधीच्या तक्रारीवरून त्याच्या जीवाला धोका असल्याची पोलिसांना कल्पना न्हवती का? पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असते आणि आधीच हल्लेखोराबाबत कडक पाऊले उचलली असती तर आज आमचा प्रशांत आमच्यात असता! अशी भावना मृत प्रशांतचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.
संगमेश्वर पोलीसांना गांभीर्य आहे की नाही?
प्रशांतचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडल्याने कुटुंबीय निशब्द झाले. प्रशांतला मारून टाकण्यात आल्याच्या दाट संशयाने कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सुरुवातीला नकार दिला. मात्र पोलिसांनी कुटुंबियांना मृतदेहाची अवहेलना करत आहात त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असे सांगितल्यानंतर दुःखात असलेले कुटुंबातील काही सदस्य घाबरले अन् मृतुदेह ताब्यात घेतला. मात्र मृत प्रशांत हा त्याच्या चुलत भावाविरोधात आधीपासून भीती व्यक्त करत होता.
कारण मृत प्रशांतवर यापूर्वीच कोयता, दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न चुलत भावाकडून झाला होता. या प्रकरणाची इतकी पार्श्वभूमी असताना ही संगमेश्वर पोलीसांना गांभीर्यच नसल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? असे एक नवे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकरणाबाबत रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून सखोल तपास करणे आवश्यक आहे. आमचा प्रशांत आम्ही गमावला मात्र आता आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी नातेवाईक आणि कुटुंबियांकडून केली जात आहे.
प्रशांतचा व्हिसेरा कोल्हापूरला पाठविला….
झाडाझुडपात मृतदेह सापडलेल्या प्रशांत पवार याचा व्हिसेरा तपासणीसाठी कोल्हापूर लॅबकडे पाठविण्यात आल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली आहे. प्रशांतचा घातपात की आत्महत्या? याबाबत संगमेश्वर पोलीस तपास करीत आहेत. मात्र व्हिसेरा तपासणीनंतरच आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होणार आहे. अहवालातून कोणती माहिती पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*