संगमेश्वर : करजुवे खाडीत रात्रीच्या वेळी वाळू चोरी, चार डंपरवर पोलिसांची कारवाई

banner 468x60

संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीपट्ट्यात मंगळवारी रात्रीच्या वेळी दोन ते तीन वाळू व्यवसायिक मध्यरात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने ड्रेझरने जवळपास तीनशे ब्रास वाळू उपसा केला. रातोरात सदरची वाळू डंपरच्या माध्यमातून जागेवरून हलवली जात होती .

banner 728x90

मात्र संगमेश्वरचे धडाकेबाज पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी वाळू भरलेले चार डंपर करजुवे येथे पकडून त्यांच्यावर कारवाई केली असून वाळू चोरी रोखण्यात संगमेश्वर तालुक्याचा महसूल विभाग पूर्णतः अपयशी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

वाळू चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने आता करजुवे तलाठी, मंडल अधिकारी आणि संगमेश्वर तहसीलदार यांच्यावर महसूल मंत्री कोणती कारवाई करतात ? याकडे संगमेश्वर तालुका वासियांचे लक्ष लागले आहे. करजुवे येथून चोरट्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची कुणकुण संगमेश्वरचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांना लागताच त्यांनी मध्यरात्री या छुप्या वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी थेट करजुवे गाठले.

शासनाचे नुकसान करून छुप्या पद्धतीने आणि ड्रेझरचा वापर करून संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीत बेसुमार वाळू उपसा सुरू होता. मात्र प्रत्यक्षात पोलिसांना करजुवे येथे ओली वाळू भरलेले चार डंपर आढळून आले. महसूल मंत्र्यांनी ज्या भागात वाळूची चोरी होताना आढळेल तेथील तहसीलदारांना निलंबित केले जाईल,अशी घोषणा विधानसभेत करतात ठीक-ठिकाणच्या वाळू चोरीला आळा बसला.

याचाच अर्थ या वाळू चोरीला महसूल विभागाचा छुपा पाठिंबा होता असा अर्थ निघतो. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीभागात गत महिन्यात पाच ते सहा वाळूमाफियांकडून बेसुमार वाळू उपसा केला जात होता. मात्र थेट तहसीलदारांवरच कारवाईची घोषणा होताच हे चोरटे व्यवसाय तात्पुरते बंद करण्यात आले.

महसूलचे अधिकारी स्वतःवर कारवाईची वेळ येताच वाळू चोरीचे प्रकार एका दिवसात थांबू शकतात, हेच यातून सिद्ध झाले. मात्र एका रात्रीत लाखो रुपये कमवण्याची सवय झालेले वाळूमाफिया गेले आठवडाभर करजुवे खाडी भागात छुप्या पद्धतीने मध्यरात्री ड्रेझरच्या सहाय्याने वाळू काढत असल्याची चर्चा या परिसरात पसरली होती. मंगळवारी

मध्यरात्री पोलीस अधिकाऱ्यांनी या छुप्या आणि चोरट्या वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी करजुवे गाठले मात्र ड्रेझरच्या साहाय्याने वाळू चोरी करणारे खाडीत फरार झाले. मात्र प्रत्यक्षात जागेवर ओली वाळू भरलेल्या स्थितीत आढळलेल्या डंपरवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये १) राजेश रविंद्र चव्हाण, वय ३१ वर्षे, रा. डेरवण, चव्हाणवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.२) विक्रम विलास महाडीक, वय ३२ वर्षे, रा. मुरादपुर, शंकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.३) शुभम अजित चव्हाण, वय २३ वर्षे, रा. कळंबुशी, अलेटीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, ४) डंपर नंबर एम. एच ०९ टी.सी. ०१५८ वरील चालक नाव गाव माहिती नाही.

डंपर आणि वाळू सह एकूण साठ लाख साठ हजारांचा मुद्देमाल संगमेश्वर पोलिसांनी जप्त केला आहे. करजुवे खाडी भागात दररोज महसूल विभाग गस्त घालत असल्याचे संगमेश्वर तहसीलदार यांनी सांगितले होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री संगमेश्वरचे तडफदार पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी वाळू चोरी करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केल्यानंतर महसूल विभागाची गस्त म्हणजे एक फार्स होता, हे आता स्पष्ट झाले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई होते मग खाडीतून वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई का होत नाही ?

असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संगमेश्वर पोलिसांच्या कारवाईनंतर आता करजुवे भागातील तलाठी आणि मंडल अधिकारी तसेच करजुवे येथील चोरट्या वाळू व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदारांवर महसूल मंत्री कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *