संगमेश्वर : “जीवाचे काही बरे वाईट केल्यास…अधिकारी जबाबदार”, शाळा तपासणीच्या नावाखाली महिला शिक्षिकेचा छळ

banner 468x60

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात पार पडले. या प्रशिक्षणात देण्यात आलेल्या जेवणाबद्दल चौकशी केली, म्हणून संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील एका शाळेत गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी शाळा तपासणीच्या नावाखाली महिला शिक्षिकेचा छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

banner 728x90

याबाबत या शिक्षिकेने प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांसह संबंधितांकडे तक्रार केली आहे. शाळा तपासणी करायची म्हणून केंद्रप्रमुख व सहकारी शिक्षक असा एकूण 9 जणांचा फौज फाटा शाळेत पाठविण्यात आला. त्या नंतर अधिकारी हे स्वतः मागून आले. वर्ग तपासणीवेळी संबंधित महिला शिक्षिकेला जाणीवपूर्वक वर्गाच्या बाहेर उभे करून ठेवण्यात आले.

रेकॉर्ड तपासणी वेळी रेकॉर्डसंदर्भात बोलताना भात कसा होता? वरण कसं पाहिजे यासाठी ट्रेनिंगला जाता का, असे प्रश्न विचारण्यात आले. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी शेरा देताना ही शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करत असल्याचा शेरा जाणीवपूर्वक दिला. या बाबत विचारणा केली असता माझी कुठे करायची तिकडे तक्रार करा, साधीसुधी तक्रार करू नका थेट आयुक्तांना तक्रार करा, अशी भाषाही वापरण्यात आली.

शाळा तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित असताना फक्त चार जणांनीच उपस्थित असल्याची सही केली. इतके लोक आणून या शिक्षिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शिक्षिकेचे मानसिक खच्चीकरण झाले असून त्यांना नैराश्य आले आहे.

दरम्यान, झालेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी जि. प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे. आलेल्या नैराश्याने आपण आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *