संगमेश्वर : अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (वय ४२, रा. देवरुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारास आरोपी क्रमांक १ सुरज उदय नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून बेकायदेशीररीत्या सुमारे २५ ब्रस, किंमत अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची वाळू उपसून ठेवली होती. त्यानंतर आरोपी क्रमांक २ शकील अहमद (वय २४, रा. उत्तर प्रदेश) व आरोपी क्रमांक ३ राजकुमार प्रजापती (रा. चिपळूण) हे दोघेही घटनास्थळी येऊन

एकमेकांच्या संगनमताने वाळूचे लोडिंग व वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ₹३२,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये २५ ब्रस वाळू – २,५०,००० रु., जेसीबी (MH09/CL/0507) २०,००,००० रु., डंपर (MH08/W/8724)- १०,००,००० रु. यांचा समावेश आहे. माखजन पोलिस दुरक्षेत्राच्या अकरांस नंबर ६२/२०२५ वरून वरिष्ठांच्या आदेशानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई मपोहेकॉ के. आर. सावंत यांनी केली असून पुढील तपास पोउनि व्ही. डी.

साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *