रत्नागिरी : पत्नीने बडबड थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केल्यानंतर तिने बडबड करू नका, असे सांगितल्याच्या रागातून ६० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १५ डिसेंबर) रात्री पावस (ता. रत्नागिरी) येथील सामंतवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

banner 728x90 banner 728x90

मृत वृद्धाचे नाव अशोक रामचंद्र वारीसे (वय ६०) असे असून त्यांना दारूचे व्यसन असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अशोक वारीसे हे दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत बडबड सुरू केली. यावर पत्नीने त्यांना बडबड करू नका, असे समजावण्याचा प्रयत्न केला.

याच रागातून अशोक वारीसे हे आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना बाहेरून हाका मारल्या; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

शेवटी त्यांच्या मुलाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, अशोक वारीसे यांनी खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ खाली उतरवून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

दारूच्या व्यसनातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *