रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या 13 बांग्लादेशी नागरिकांना न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबर 2024 रोजी माहिती मिळाली की, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बांग्लादेशी नागरिक अनधिकृतरित्या भारतात प्रवेश करून राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता 13 बांग्लादेशी नागरिक आढळले.
पोलीस तपासात या सर्व आरोपींकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. त्यामुळे ते बांग्लादेशी नागरिक असल्याची खात्री झाल्यानंतर, पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी. रत्नदीप साळोखे यांनी केला. त्यांनी वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
गुरुवारी 03 एप्रिल 2025 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणात दोषी ठरलेले बांग्लादेशी नागरिक म्हणजे वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली,
मोहम्मद नुरहसन जहर सरदार आणि मोहम्मद लालतू मोंदल किताब अली यांचा समावेश आहे. या तपासात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रत्नागिरी पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी तपास अधिकारी व दहशतवादी विरोधी पथकातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला 1000 रुपये बक्षीस जाहीर केले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने या 13 दोषी बांग्लादेशी नागरिकांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी संबंधित एजन्सींकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. लवकरच ते बांग्लादेश सरकारकडे सुपूर्द केले जातील.ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध स्थलांतरितांच्या प्रश्नावर मोठा धडा देणारी आहे.
पोलिसांनी वेळीच माहिती मिळवून कारवाई केली आणि अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात कठोर पावले उचलली. आगामी काळात अशीच सतर्कता ठेवून आणखी कोणतेही अनधिकृत स्थलांतरित भारतात आश्रय घेत आहेत का, यावर पोलीस नजर ठेवतील.’

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*