अखेर ठरलं ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार – नारायण राणे – विनायक राऊत आणि शकील सावंत

banner 468x60

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, हा तिढा अखेर सुटला आहे.

गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कोकणात आता तिहेरी लढत होणार आहे.

ठाकरे गटाकडून विनायक राऊत, कोकण प्रादेशिक पक्षाकडून शकील सावंत तर भाजपकडून नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि कोकण प्रादेशिक पक्षाचे शकील सावंत अशी लढत असणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही उमेदवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. नारायण राणेंची राजकीय सुरुवात शिवसेनेपासूनच झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास केला तर विनायक राऊत मात्र सुरुवाती पासून शिवसेनेत राहिले.

विनायक राऊत २०१४ पासून दोनदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार म्हणूनही काम केले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील राजकीय परिस्थिती बदललेली आहे.

अशा स्थितीमध्ये शिंदेची आणि त्यांच्या आमदारांची साथ भाजपाला मिळणार असली तरी, ठाकरेंचे शिलेदारही त्यांचा किल्ला ताकदीने लढवतील. तर दुसरीकडे कोकण प्रादेशिक पक्षाचे शकील सावंत यांनी देखील दोन्ही जिल्ह्यात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचं राजकीय गणितं


2009 मध्ये काँग्रेसचे निलेश राणे यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा 46 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या निलेश राणेंना दीड लाख मतांनी हरवलं.

2019 मध्ये नारायण राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणेंनी निवडणूक लढवली. मात्र राऊतांनी त्यांना पुन्हा एकदा पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि भाजपचा 1 आमदार आहे

नारायण राणे – विनायक राऊत – शकील सावंत


शिवसेना ठाकरे गटाकडून सलग तिसऱ्यांदा विनायक राऊत (Vinayak Raut) निवडणूक लढवत आहेत. मात्र आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झाल्यानं राऊतांच्या अडचणी वाढल्यात.  शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक होते.

ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं. शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि नारायण राणे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे.

एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते गमावत नाहीत. त्यामुळं राणे विरुद्ध राऊत असं कोकणी धूमशान यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गात चांगलंच रंगणाराय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा दारूण पराभव केला होता.

त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आता राणेंना आहे.. राणे पराभवाचा वचपा काढणार की, विनायक राऊत हॅटट्रिक साधणार, याचा फैसला 4 जूनला होणाराय.

तर तिसरीकडे कोकण प्रादेशिक पक्षाचे शकील सावंत हे देखील यावेळी लोकसभेच्या रिंगणात आहेत. शकील सावंत हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही मतदार संघात त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे. दिग्गज लोकसभेच्या मैदानात असताना शकील सावंत यांनीही खासदार विनायक राऊत आणि नारायण राणेंना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात प्रचार आधीपासूनच सुरु केलाय.

पूर्ण एप्रिल महिना प्रचाराला मिळणार असून याचाच फायदा सध्या शकील सावंत यांनी घेतलाय. गावोगावी जाऊन ते सध्या प्रचार करत आहेत.


रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लोकसभेची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आहे. दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर चार जून ला निकाल येणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *