रत्नागिरी : स्कॅनर आहे का विचारलं म्हणून मिरकरवाड्यात विक्रेत्याकडून तरुणाला मारहाण, मारहाणीला वेगळं वळण

banner 468x60

मिरकरवाडा जेटी परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

banner 728x90

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती.मिळालेल्या माहितीनुसार, मिरकरवाडा जेटीवर एका ग्राहकाने पिशवी विक्रेत्याकडून ३ रुपयांची पिशवी खरेदी केली. मात्र ग्राहकाकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने गुगल पे द्वारे पैसे देण्याची तयारी दर्शवली आणि विक्रेत्याकडे क्यूआर कोड मागितला.

मात्र, विक्रेत्याने याला उद्धटपणे उत्तर दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद काही क्षणांतच वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. वाद वाढल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे ३० ते ४० जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली.

दुसरीकडे, पिशवी विक्रेत्यानेही आपल्याला ग्राहक आणि त्याच्या साथीदारांकडून मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या हाणामारीत दोन्ही गटांना दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेनंतर ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी थेट जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तर पिशवी विक्रेत्याने हुशारी दाखवत आधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि नंतर रुग्णालयात दाखल झाला.हाणामारीनंतर दोन्ही गट जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, जिथे त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली.

यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. शहर पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, “तुमची काही तक्रार असेल तर आधी पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार दाखल करा,” असा सल्ला दिला. यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्राहक आणि त्याच्या साथीदारांचा दावा आहे की, त्यांना जमावाने बेदम मारहाण केली, तर पिशवी विक्रेत्याने ग्राहक गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारी नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे साणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शहर पोलिस निरिक्षक शिवरकर यांनी केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *