रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. काळ शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाला जिल्हा पुरवठा विभागातील या लाचखोरी संदर्भात तक्रार प्राप्त झाले होते.
त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संबंधित अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. या कारवाई संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू होती. प्रदीप प्रीतम केदार ( वय ५०)असे लाच घेणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे.
धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करू यासाठी या अधिकाऱ्याने ही लाच मागितली होती. तक्रारदार (वय ५०), हे संगमेश्वर येथील पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अखत्यारीतील संगमेश्वर येथील धान्य गोदामास जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि तहसीलदार संगमेश्वर यांनी २२ मार्च २०२५ रोजी भेट दिली होती.
त्यावेळी तक्रारदार गैरहजर होते. त्यानंतर आरोपी अधिकारी प्रदीप केदार यांनी गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यात तफावत असल्याचे नमूद केले. तक्रारदारांच्या गैरहजेरीचा आणि तफावतीचा नकारात्मक अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठवण्यासाठी केदार यांनी तक्रारदारांकडे सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोडीअंती ११ हजार रुपये निश्चित झाले. ही रक्कम २८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारताना केदार रंगेहात पकडले गेले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २८ मार्च रोजीच तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी करून त्याच दिवशी सायंकाळी सापळा रचण्यात आला.
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकात सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा दीपक आंबेकर, पोहवा संजय वाघाटे, पोहवा विशाल नलावडे आणि पोअं राजेश गावकर यांचा समावेश होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने (एजंट) लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२२२८९३, ७५८८९४१२४७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















