रत्नागिरी : पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक

banner 468x60

हातखंबा-खेडशी मार्गावर अज्ञात मोटारसायकलस्वारांनी एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची खोटी बतावणी करून तिच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ फसवून चोरून नेली.

banner 728x90

ही घटना ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशिता बळीराम म्हापुस्कर (वय ८०, रा. हातखंबा नागपूर पेठ) त्यांची नात सोबत घेऊन दुचाकी क्रमांक एमएच ०८ बीजी ८३९७ ने खेडशी येथील डॉ. मुकादम हॉस्पिटलमध्ये जात होत्या.

हातखंबा तिठा ते खेडशी रोडवर हॉटेल सिध्दाईच्या पुढे आल्यावर मागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर त्या मोटारसायकलस्वाराने म्हापुस्कर यांना दुचाकीवरून खाली उतरण्यास लावले आणि सांगितले की, पुढे रोडवर चोऱ्या-माऱ्या सुरू आहेत, त्यामुळे तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा.

त्याचवेळी तेथे असलेल्या एका गोऱ्या रंगाच्या आणि बारीक डोळ्यांच्या इसमाने आणि मोटारसायकलस्वाराने संगनमत करून वृद्ध महिलेची फसवणूक केली. मोटारसायकलस्वाराने आपली नकली सोन्याची चैन काढून देण्याचा बहाणा करत ती एका कागदाच्या पुडीत बांधली आणि फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याची माळ कागदात बांधण्यासाठी मागून घेतली. याच संधीचा फायदा घेत त्याने फिर्यादी यांची सोन्याची माळ आपल्याकडे ठेवून घेतली आणि त्याच्याकडील कागदाच्या पुडीतील खोटी चैन फिर्यादी यांच्या पर्समध्ये ठेवली.

त्यानंतर त्या मोटारसायकलस्वाराने तेथे असलेल्या गोऱ्या रंगाच्या बारीक डोळ्यांच्या इसमाला ‘चल, तुला साहेबांकडे नेतो’ असे सांगून मोटारसायकलवरून ते दोघेही निघून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अशिता म्हापुस्कर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१९(२) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *