रत्नागिरी : ऑनलाईन मैत्री महागात; रत्नागिरीत नोकरदाराला 22 लाखांचा गंडा

banner 468x60

ऑनलाईन मैत्रीच्या आमिषाला बळी पडून रत्नागिरीतील एका नोकरदार व्यक्तीची तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलील अब्दुल कादीर काझी (वय ४५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांची एका वेबसाईटवरून युनायटेड किंगडममधील टिआगो फॉरा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला.


२२ जुलै २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपी टिआगो फॉरा याने व्हॉट्सॲपद्वारे सलील काझी यांच्याशी संपर्क ठेवत बनाव रचला. त्याने दिल्ली इमिग्रेशन विभागाने ६० हजार युके पाउंड आणि सोने बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी आपल्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले.


दरम्यान, या कटात स्वतःला दिल्लीतील पासपोर्ट इमिग्रेशन ऑफिसर म्हणवून घेणाऱ्या प्रिया शर्मा हिनेही सहभाग घेतला. दोघांनी मिळून सलील काझी यांना ६० हजार पाउंड आणि सोने भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी तसेच टिआगोची सुटका करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे पटवून दिले.

आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सलील काझी यांनी आपल्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांमधून वेळोवेळी एकूण २२ लाख २१ हजार ४०० रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. मात्र, त्यानंतर आरोपींनी पैसे परत न करता संपर्क तोडला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काझी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टिआगो फॉरा आणि प्रिया शर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *