एलआयसीने दामदुप्पट परतावा देणारी नवी योजना अंमलात आणली आहे, अशी बतावणी करत खातेधारकांकडून लाखो रुपये उकळून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून खातेधारकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यामध्ये एका एलआयसी एजंटसह लांजातील एका व्यावसायिकाचा हात आहे. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर खातेधारकांनी आता धावाधाव सुरू केली आहे.
मार्केटमध्ये रोज नवनवीन कंपन्या येत असतात. गुंतवणुकीतून जास्तीतजास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बोगस कंपन्यांकडून अनेकांची फसवणूक झाली आहे. गेले दोन ते तीन वर्षापूर्वी फॉरेन करन्सीमध्ये शेअर मार्केटचे मोठे फॅड आले होते.
गर्व्हमेंट अधिकार्यांसह अनेक उद्योजक, बिल्डर आदींनी त्यामध्ये पैसा गुंतवला. प्रत्येकजण आपापली टीम वाढवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामध्ये एका एलआयसी एजंटचा पुढाकार फार मोठा होता.
वादग्रस्त असलेला हा एलआयसी एजंट आपल्या जुन्या खातेधारकाकडे गेला. त्या खातेधारकाचा विश्वास संपादन करून त्याने एलआयसीच्या नव्या योजनेची माहिती दिली. प्रत्यक्षात ती योजनाच अंमलात आली नव्हती. या योजनेतून दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष तो आपल्या खातेधारकांना देत होता.
एलआयसीच्या नावाखाली लाखो रूपये घेतले
खातेधारकाकडे आलेला एलआयसी एजंट हा विश्वासातील होता. मात्र त्याचे कारनामे त्या खातेधारकाला माहित नव्हते. त्यामुळे एलआयसीमध्ये गुंतवलेले पैसे जाणार कोठे? असा समज खातेधारकाचा झाला आणि खातेधारकाने जमा केलेली आयुष्यभराची पुंजी त्या एलआयसी एजंटच्या हाती दिली.
एलआयसीमध्ये पैसे गुंतवल्यानंतर खातेधारकाने त्याच्या पावत्यांची मागणी त्या एजंटकडे केली. मात्र माझ्यावर विश्वास नाही का? आजपर्यंत तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसी मीच भरत आलोय, माझ्यावर विश्वास ठेवा अशा भूलथापा तो वादग्रस्त एजंट खातेधारकांना देत होता.
एलआयसीच्या नावाखाली पैसे घेऊन तीन वर्षे उलटली तरी दरवर्षी मिळणारा दामुदुप्पट परतावा खातेधारकाला मिळाला नाही. त्यामुळे खातेधारकाने त्या एलआयसी एजंटकडे त्याची विचारणा केली. एलआयसी एजंटने कंपनी एकत्रित मोठ्या रक्कमेच परतावा देणार आहे, आता घाई करू नका असे वेळोवेळी सांगून वेळ मारून नेली.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारी मोठी टोळी रत्नागिरीत सक्रीय झाली होती. त्यामध्ये त्या एलआयसी एजंटचा एक जोडीदार होता. लांजातील जोडीदार हा व्यावसायिक असल्याने या दोघंानी मिळून आपापल्या ओळखीतील लोकांकडून लाखो रुपये उकळले होते.
भारतीय शेअर मार्केट असेल अथवा परकीय शेअर मार्केट. त्यामध्ये इन्ट्रा डे नावाची एक कन्स्पेट आहे. सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर गुंतवणूक सुरू होते. शेअर बाजार तेजीत आहे, ज्या कंपनीमध्ये शेअर गुंतवले त्या कंपनीच्या शेअरची अपडेट मोबाईल स्क्रीनवर दिसत असते.
दुपारी ३ वाजण्याच्या आत इन्ट्रा डे सेल किंवा बाय हे करायचे असते आणि त्यातच श्रीमंत होण्याचे स्वप्न बघून लोकांकडून जमवलेले लाखो रूपये त्यांनी शेअर मार्केटमध्ये घालवले.
आता आपले काही खरे नाही. लोकांना पैसे द्यायचे कसे? जो तो एकमेकांकडे बोट दाखवू लागला. काहींनी तर पैसे देण्याची हमी देत तसे चेक खातेधारकांना दिले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यातच फुटकी कवडी नसल्याने हे चेक वटणार तरी कसे? असा प्रश्न खातेधारकांसमोर उभा राहिला आहे.
दामदुप्पट पैसे देणारी स्कीम सांगून लोकांकडून लाखो रूपये या जोडगोळीने उकळले. काही ठिकाणी एलआयसीचे नाव वापरले. एलआयसी एजंट असलेला व्यक्तीच स्कीम सांगतो त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. मात्र आता सार्यांचीच फसवणूक झाली आहे.
फसवणुकीचा आकडा हा काही लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी काही खातेदार आता धडपड करीत आहेत. मात्र भलताच पोहोचलेला तो एलआयसी एजंट रात्रीच्या वेळेस काहींना कॉल करून तुमचे पैसे मिळतील असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहे. काहींना तर भेटायला येण्याचे मॅसेजदेखील त्याने केले आहेत.
काही खातेधारकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एलआयसीच्या नावाखाली आमची फसवूणक झाली आहे. लाखो रूपये आमच्याकडून एलआयसी पॉलिसीसाठी एलआयसीच्या एजंटने घेतले.
त्याच्या ना कोणत्या पावत्या दिल्या, ना कोणता मोबदला अद्याप आम्हाला मिळाला. लवकरच एलआयसी ऑफिसमध्ये त्याबाबतची रितसर तक्रार करणार असल्याचे खातेधारकांनी सांगितले.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*