रत्नागिरी : एलईडी बेकायदा मासेमारीवर धडक कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त

banner 468x60

समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणाऱ्या बेकायदा मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने धडक मोहीम सुरू केली असून, मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. ‘भराडी प्रसन्न’ या नौकेला गस्ती पथकाने रंगेहात पकडत जप्त केले आहे.

३ एप्रिलच्या रात्री सुमारे १०.८३ सागरी मैल अंतरावर ही नौका एलईडी दिवे वापरून मासेमारीची तयारी करत असताना गस्तीवरील पथकाच्या निदर्शनास आली. ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी स्मिन्तल कांबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. मिऱ्या-काळबादेवी समुद्र परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणारी नौका दिसल्याने पथकाने तपासणी केली. त्यावेळी कैलास उल्हास कुबल यांच्या मालकीची ही नौका तांडेल आणि पाच खलाशांसह एलईडी दिवे व जनरेटरच्या सहाय्याने माशांना आकर्षित करत असल्याचे आढळले.

पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या या कृत्रिम प्रकाश पद्धतीचा वापर केल्यामुळे पथकाने नौकेसह सर्व साहित्य तात्काळ जप्त केले. सध्या ही नौका आणि जप्त केलेले साहित्य मिरकरवाडा बंदरात कडक सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात आले आहे.


या मोहिमेत सुरक्षा रक्षक सुजन पोवार, अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

समुद्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *