सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे राज्यातील रास्त दर धान्य दुकानांमधून ई-पॉस मशिनद्वारे होणारे धान्य वाटप थांबविण्यात आले होते.
यामुळे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सर्वसामान्यांची अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने ऑफलाईन धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत होती.
शासनाने ही विनंती मान्य केली असून, ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी फक्त जुलै महिन्यासाठी असल्याचे शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कळविल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून धान्य वितरण करण्याकरिता रास्तधान्य दुकानांमध्ये फोर-जी तंत्रज्ञान असलेल्या ई- पॉस मशिन बसविण्यात आल्या.
राज्यात काही दिवसांपासून रास्त दर भाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून धान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निर्देशनास आले. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफ लाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली.
राज्यातील सर्व्हर संबंधित तांत्रिक अडचणीचे सुटेपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात येत आहे. ऑफलाईन धान्याचे वितरण शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे. त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात या कालावधीतील ऑफलाईन वितरण केलेल्या धान्याचा तपशिल शासनास सादर करावा.
तसेच ऑफलाईन वाटप करण्यात आलेल्या धान्याचा तपशील एफपीएस लॉगीनद्वारे आयएमपीओएस पोर्टलवर भरण्याची तसे केवळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांस अन्नधान्य वितरीत करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी / धान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांची राहील.
तसेच ऑफ लाईन सुविधा फक्त जुलै २०२४ मधील अन्नधान्य वितरणासाठी उपलब्ध राहील, असेही शासनाने कळविले आहे. त्यामुळे या महिन्यातील रास्त धान्य आता वितरित केले जाणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*