रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे ७० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ३७ प्रवाशी जखमी झाले असून ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या भीषण अपघातात १ वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला.
नेपाळ येथून सोमवारी ११० महिला- पुरूष घेवून ही खाजगी बस निघाली होती. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरून ही बस रत्नागिरीच्या दिशेने येत असताना पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही बस आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व बस थेट संरक्षक कठडा तोडून सुमारे ७० फूट दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारात ही बस अचानक दरीत कोसळल्यानंतर बसमधील प्रवाशी घाबरून गेले.
काय करावे हे त्यांना सुचेनासे झाले. वाचण्याकरीता त्यांनी किंकाळ्या फोडल्या.
याचवेळी पाठीमागून रत्नागिरी येथील शिवराज कलामंचचे शेखर पांचाळ व कलाकार आंबा चाळणवाडी येथे दत्तजयंती निमित्त नमनाचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीकडे परतत असताना त्यांना रस्त्याचा संरक्षक कठडा तोडून वाहन दरीत कोसळल्याचे दिसले. क्षणार्धात या सर्व कलाकारांनी गाडीतून उतरत पोलीसांना अपघाताची माहिती दिली. तसेच अँम्ब्युलन्स बोलावली.
यानंतर या सर्वांनी पोलीसांच्या मदतीने सर्व प्रवाशांना दरीतून सुखरूप वरती आणले. व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली.
दरम्यान, या प्रवाशांमध्ये एक दांम्पत्य आपल्या १ वर्षाच्या मुलग्याला घेवून प्रवास करत होते. मात्र भीषण अपघातात हे दांम्पत्य बचावले असून त्यांचा चिमुकलादेखील बालंबाल बचावला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की संरक्षक कठडा तोडून ही बस दरीत कोसळली. या बसने दरीतील आंब्याच्या झाडाला धडक दिली. बसच्या धडकेने आंब्याचे झाड मध्येच तुटले आहे. या आंब्याच्या झाडाला धडक देत ही बस आणखी खाली जावून पलटी झाली.
या भीषण अपघातातून दाम्पत्यासह त्यांचा अवघा १ वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आमचा मुलगा या अपघातातून बचावल्याची भावना या दाम्पत्याने बोलून दाखवली. त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













