रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या परिसरात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक एका तरुणाच्या जीवावर बेतली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिकांनी क्षणार्धात घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने जात असताना, मिऱ्याकडून शहराकडे येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी भाटी मिऱ्या येथील वळणावर तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आघात इतका तीव्र होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

या अपघातात स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेले तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाच्या दातांसह जबड्याला गंभीर इजा झाली असून तो भाग शरीराबाहेर आल्याचे चित्र अत्यंत विदारक होते. अन्य एकाची प्रकृती गंभीर असून, तिसऱ्याला तुलनेने किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून मिऱ्या रोडवरील वाढत्या अपघातांनी पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













