युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात घरगुती गॅस मिळण्यात कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ७०५७२२२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हा पुरवठा कार्यालयाने सर्व तालुका स्तरावर पथके स्थापन करून गॅस एजन्सींना नियमित भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय आणि अडचणी जाणून घ्याव्यात तसेच त्याची माहिती जिल्हा कार्यालयास तात्काळ कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यापूर्वी दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये १० दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता, तो आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला असून यासंदर्भातील फलक सर्व गॅस एजन्सींनी आपल्या कार्यालयाबाहेर लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत प्र. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र गॅस टंचाईची शक्यता असल्याच्या भीतीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले जात असल्याने एजन्सींवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे वेटिंग वाढले असले तरी गॅस पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर एचपीसीएल कंपनीचे मिरज हजारवाडी, बीपीसीएल कंपनीचे वाई (सातारा) आणि इंडेन कंपनीचे चाकण (पुणे) येथून प्राप्त होतात. जिल्ह्यासाठी दररोज सुमारे ६९०० ते ७२०० सिलेंडरची मागणी असून तीनही कंपन्यांकडून सरासरी ७५०० सिलेंडरचा पुरवठा होत असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील गॅस एजन्सी प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. शांतादुर्गा गॅस एजन्सीचे सुमारे ८५ हजार ग्राहक असून दररोज १५०० ते १६०० सिलेंडर वितरण केले जाते. मनोरमा गॅस एजन्सीचे १७ हजार ग्राहक असून दररोज ३०० ते ३५० सिलेंडर वितरित केले जातात. तसेच रत्नागिरी गॅस एजन्सीचे १८ हजार ग्राहक असून दररोज सुमारे ३०० सिलेंडर वितरित केले जातात. उपस्थित एजन्सी प्रतिनिधींनी घरगुती गॅस वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














