रत्नागिरी : बिबट्याच्या कातड्यांची तस्करी उघड; चार जण ताब्यात, आलिशान कार जप्त

banner 468x60

कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर सीमा शुल्क विभागाने रविवारी पहाटे धाडसी कारवाई करत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त करण्यात आली असून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती. अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून २९ मार्च रोजी पहाटे महामार्गावर सापळा रचण्यात आला.

यावेळी संशयास्पद वाटणारी Kia Seltos ही मॅरून रंगाची कार अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बिबट्यांची कातडी लपवून ठेवलेली आढळली. पथकाने तत्काळ कारसह कातडी जप्त केली. तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणातील चार आरोपींमध्ये कुडाळ येथील दोन जण, तर सातारा आणि लातूर येथील प्रत्येकी एक जण असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ आणि सीमा शुल्क कायदा १९६२ अंतर्गत करण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या वन्यजीव तस्करीसंबंधी माहिती मिळाल्यास ७२१९२१२३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *