राजापूर : राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या मानसी हांदेचा पाचल येथे सत्कार

banner 468x60

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला व क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी करत गावाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे यांनी केले.

banner 728x90

पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल यांच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर पाचल प्रशालेच्या वाडिया हॉलमध्ये राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कुमारी मानसी संजय हांदे हिचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना मानसी हांदे हिने संस्था, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे आभार मानले. शाळा व महाविद्यालयातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच क्रीडा क्षेत्रात वाटचाल शक्य झाली, असे तिने सांगितले. खेळामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे असून क्रीडा क्षेत्रातूनही उज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होतात, असा विश्वास तिने व्यक्त केला.

मानसी हिने कबड्डीपासून आपल्या क्रीडा प्रवासाची सुरुवात केली असून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. लॉकडाऊननंतर तिने पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे वळून स्क्वॉट, बेंच प्रेस व डेड लिफ्ट या तिन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले असून भारताचे प्रतिनिधित्व करताना तिसरा क्रमांक मिळविला आहे.

ध्येय ठरवून सातत्य, योग्य आहार व कष्टांची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते. अपयश व संघर्ष येतात, मात्र जिद्द आणि चिकाटी असेल तर वेळ नक्की बदलतो, असा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोरभाई नारकर, कोषाध्यक्ष राजू लब्दे, संचालक विकास कोलते, मुख्याध्यापक सौ. आशा गुरखे, पर्यवेक्षक प्रमिला गांधी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मानसीच्या उज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *