राजापूर : घरफोडी प्रकरणाचा छडा; 2 आरोपी ताब्यात

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.

banner 728x90


​दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथे ही घटना घडली होती. चार अज्ञात इसमांनी अंधाराचा फायदा घेत श्री. सदानंद शांताराम मोरे (५५ वर्षे) यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. दोन चोरटे खिडकीतून तर दोन मुख्य दरवाजातून आत शिरले होते. त्यांनी घरातील सुमारे १,००० ते १,२०० रुपये असलेला पैशांचा डब्बा चोरून लुटमारीचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे मोरे कुटुंब आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


​या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.
​पोलिसांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता, हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सुनील पवार आणि त्याच्या टोळीने केल्याचे समोर आले.
​​आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक

पथक सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात रवाना झाले होते. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी संशयित आरोपी इंदापूर हायवेवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सुनील भिमा पवार (वय २७, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव), अजय उतरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) या दोघांना ताब्यात घेतले.
​प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या अन्य दोन साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत.
​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोउनि सुधीर उबाळे, संदीप ओगले आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास राजापूर पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *