राजापूर : ॲड. हुस्नबानू खलिफे यानी स्विकारला राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार

banner 468x60

राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी आपल्या सहकारी नवनिर्वाचित नगरसेवकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत बुधवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.

banner 728x90

       नुकत्याच झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या श्रृती ताम्हनकर यांचा पराभव करत विजय मिळविला होता. तर २० नगरसेवकांपैकी दहा जागी महायुती तर दहा जागी महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत.

बुधवारी नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला आहे. त्यामुळे आता गेले चार वर्षे असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधींकडून कारभार सुरू झाला आहे.

       बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत एड. खलिफे यांनी नगर परिषदेत प्रवेश करत पदभार स्विकारला. तत्पुर्वी जवाहर चौकात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत भविष्यात राजापूर शहराचा विकास आपल्याला करावयाचा असल्याचे नमुद केले. ज्या विश्वासाने राजापूरकरांनी मला या पदावर निवडून दिले आहे तो विश्वास कामाच्या माध्यमातुन आपण सार्थ ठरवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       त्यानंतर जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर जवाहर चौकातील दर्यावर त्यांनी चादर चढवून प्रार्थना केली. ॲड. खलिफे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी नगर परिषदेत प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नगर परिषदेली महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने न. प. चे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी माजी आमदार गणपत कदम, जमिर खलिफे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, उबाठाचे रवींद्र डोळस, काँग्रेस शहर प्रमुख आजिम जैतापकर, उबाठाचे शहर प्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष सातोसे  आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी भेटून नगराध्यक्षा ॲड. खलिफे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना भेटून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *