संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला देवरुख पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरुख येथील आपला संगणक वर्ग संपवून एस.टी. बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीच्या दिशेने जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने आधी विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन, चालत्या दुचाकीवर उभे राहून त्याने अत्यंत लज्जास्पद आणि अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, लोक जमा होण्यापूर्वीच आरोपी दुचाकीवरून पसार झाला.
घाबरलेल्या विद्यार्थिनींनी घरी पोहोचल्यावर हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी मुलींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवली आणि आरोपी हर्षल गवंडी याला ताब्यात घेतले.
देवरुख पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ७८, ७९,पोक्सो (POCSO) कायदा २०१२: कलम १२ या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषीवर कडक कारवाई केली जाईल.
आरोपी स्वतः एक सरकारी कर्मचारी असूनही त्याने केलेल्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













