खेड : 88 हजारांच्या गांजासह एकजण ताब्यात

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला जोडणाऱ्या मार्गावर खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेरळ येथील रेल्वे स्टेशनकडून महामार्गाकडे येणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला रंगेहाथ पकडले.

banner 728x90 banner 728x90


त्याच्याकडून विक्रीसाठी असलेला गांजा आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹८८ हजार ६७३/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ०१.५५ वाजण्याच्या सुमारास मौजे वेरळ येथे करण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई विकास प्रकाश पवार हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आली.


यावेळी, विनोद प्रसाद सुकर मेहता (वय ४०), सध्या रा. खोपी, ता. खेड (मूळ रा. सुकर, जि. हजारीबाग, झारखंड) हा इसम रेल्वे स्टेशनकडून महामार्गाकडे येणाऱ्या रोडवर संशयास्पद स्थितीत थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ असलेल्या सॅक बॅगमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यासह गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत हिरवट पाने, फुले, काड्या आणि चिया असलेला, उग्र वास असलेला एकूण ५४६ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. याची अंदाजित किंमत ₹८,१७३/- इतकी आहे.
या अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरलेली काळया रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (नं. एम.एच.०८ ए.व्ही.८६८३) जप्त करण्यात आली, तिची किंमत ₹८०,०००/- आहे. अशा प्रकारे एकूण ₹८८,६७३/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी रंगेहाथ जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *