मंडणगड तालुक्यात “मीटिंग”च्या बहाण्याने महिलांची फसवणूक करून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, एका भामट्याने तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव चंद्रकांत घाणेकर असून तो मूळचा चिपळूण तालुक्यातील तेवरे येथील रहिवासी आहे. सध्या तो नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात फौजदारी पात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी आरोपी चंद्रकांत घाणेकर याने तक्रारदार राजश्री विवेक गायकवाड (वय ५७, रा. विन्हे) आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर सहा महिलांना एका नियोजित मीटिंगसाठी माणगाव येथे जायचे असल्याचे सांगितले. या मीटिंगसाठी सर्व महिलांनी एकत्र प्रवास करण्याचे ठरले होते.
प्रवासादरम्यान आरोपीने महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी एक युक्ती लढवली. “मीटिंगला जाताना इतके दागिने सोबत नेणे सुरक्षित नाही. ते चोरीला जाऊ शकतात किंवा हरवू शकतात. त्यामुळे ते ऑफिसमध्ये सुरक्षित ठेवूया,” असे सांगत त्याने महिलांना आपले दागिने काढून देण्यास सांगितले. सुरक्षिततेच्या कारणास्तव महिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवत आपापले दागिने एका लिफाफ्यात भरले आणि तो लिफाफा आरोपी घाणेकरकडे सुपूर्द केला.
मात्र, दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी आरोपीने महिलांची दिशाभूल केली आणि दागिन्यांसह तेथून पोबारा केला. काही वेळानंतर महिलांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. आरोपीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पत्ता लागत नव्हता.
या फसवणुकीत सात महिलांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा मोठा ऐवज लंपास झाला आहे. साक्षी सोंडकर यांचे १ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगलसूत्र (सुमारे १ लाख रुपये), ५ ग्रॅमचे छोटे मंगलसूत्र (३३ हजार रुपये) आणि कानातील सोन्याचे झुंबर (१६ हजार रुपये) असा ऐवज चोरीला गेला. समीधा येरवणकर यांचे कानातील सोन्याचे टॉप्स (१३ हजार रुपये) आणि १० हजार रुपयांचा ओपो मोबाईल लंपास करण्यात आला. जागृती तांबुटकर यांचे सोन्याचे कैरीच्या आकाराचे झुमके (२० हजार रुपये) चोरीला गेले. तेजस्वी सुतार यांची ५ ग्रॅमची सोन्याची चैन आणि बदामी आकाराचा गंडा (३३ हजार रुपये) तसेच सानिका गायकवाड यांची ७ ग्रॅमची सोन्याची चैन व गंडा (४६ हजार रुपये) असा ऐवज आरोपीने लंपास केला.
घटनेनंतर काही दिवस आरोपीचा शोध लागला नाही. त्यामुळे अखेर १० मार्च २०२६ रोजी तक्रारदार राजश्री गायकवाड यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६ (३) आणि ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सध्या आरोपी नाशिक परिसरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक कार्यरत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














