चिपळुण, खेडमधील पुराचे पाणी ओसरले

Screenshot

banner 468x60

चिपळूण परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. वाशिष्ठी व शिव नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरातील सखल भागात पाणी शिरले होते.

मात्र, सायंकाळनंतर पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरू लागले. सकाळी शहर परिसरात शिरलेल्या पाण्याचा निचरा झाला असून, शहरवासीयांचा धोका टळला आहे. दोन्ही ठिकाणी व्यापऱ्यांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.

चिपळूण परिसरात गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला. चिपळूणमध्ये तब्बल २४३ मि.मी., खेर्डीमध्ये २३८ तर दसपटी विभागातील कळवणेमध्ये तब्बल १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरगावमध्ये १९५ मि.मी. पाऊस झाला असून हे सर्व पाणी वाशिष्ठीच्या दिशेने चिपळूण मार्गेच दाभोळच्या खाडीला जाऊन मिळते.

दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी शिरू लागले, वाशिष्ठीच्या पाण्याची पातळी ५.८० मीटरपर्यंत गेली होती. मात्र, सुदैवाने वाशिष्ठीने धोक्याची पाणी पातळी गाठली नाही. दरम्यानच्या काळात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी कोळकेवाडी धरणातून होणाऱ्या वीजनिर्मितीवर नियंत्रण ठेवले होते. सर्व जनित्रे बंद ठेवल्याने त्याचा परिणाम शहरात दिसून आला.

सायंकाळच्यावेळी शहरातील चिंचनाका येथे पाणी शिरले. रात्री ढोपरभर पाणी होते. तसेच शहरातील मुरादपूर गणपती मंदिर, रेल्वे स्टेशन रोड, शंकरवाडी, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका या ठिकाणी पाणी साचले होते. महामार्गावर नाले, पन्हे बुजविल्याने आणि महामागांला छोटासा पाईप टाकल्याने पाणी रस्त्यावर आले. चिपळूण पोलिस वसाहतीमध्ये देखील यावेळी राष्ट्रीय महामार्गच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी शिरले होते. रविवारी सायंकाळी उशिरानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि शिरलेले पाणी ओसरू लागले.

सोमवारी (दि. १५) सकाळी वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत असली तरी पावसाचा जोर कमी होता. नाईक कंपनी येथे रस्त्यावर साचलेला गाळ न.प. च्या आरोग्य विभागाच्या कर्मचान्यांनी साफ केला व पाणी मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. चिपळूण शहरात रविवारी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता जनजीवन सुरळीत झाले आहे.

परशुराम घाट व कुंभार्ली घाटातील वाहतूकही सुरळीत होती. रात्रभर एनडीआरएफ, महसूल प्रशासन, नगर परिषदेची पथके शहरातील नऊ भागात तैनात होती. प्रांताधिकारी कार्यालयातून नियंत्रण कक्षामध्ये प्रशासकीय अधिकारी सज्ज होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे यांच्यासह अन्य अधिकारी प्रांत कार्यालयात सज्ज होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *