मोठी बातमी : वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, पक्षप्रवेशाची वेळ ठरली तारीख ठरली, वैभव खेडेकरांना ‘मनसे’तून केलं बडतर्फ

banner 468x60

खेडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता वर्तवली जात होती.

banner 728x90

मात्र आज अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वैभव खेडेकरांना बडतर्फ करण्यात आलेले आहे. वैभव खेडेकर लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वैभव खेडेकर पुढच्या आठवड्यात प्रवेश करणार असल्याची माहिती कोकण कट्टा न्यूजला सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांपासून खेडेकर हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मनसेकडून थेट बडतर्फ करण्यात आलं. यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ आणि तारीख ठरली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ किंवा ५ सप्टेंबरला मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आधी ५ तारीख ठरली मात्र पुन्हा ४ तारीख ठरली असल्याची माहिती कोकण कट्टा न्यूजला सूत्रांनी दिली आहे.

काहीदिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत खेडेकर यांना शिवसेनेत प्रवेशाची ऑफर दिली होती. त्यामुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या सुरु आहे.

त्यांच्या प्रवेशासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे थेट लक्ष घालत असल्याचं समजतं. यासंदर्भात काही महत्त्वाच्या बैठकाही पार पडल्या असल्याचे बोलले जात आहे.
खेडेकर यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मनसेतून 4 जणांची हकालपट्टी
वैभव खेडेकर हे मनसेला सोडचिट्टी देणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू असताना आता थेट खेडेकरांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. मनसेकडून वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसेकडून पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका व 2029 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्या दृष्टीने भाजपाने कोकणात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून चिपळूण येथील उद्योजक ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांचे खंदे शिलेदार व आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांना भाजपा प्रवेश देण्यात आला.

आता दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे. याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांचे कोकणातील शिलेदार मनसेचे कोकणसंघटक वैभव खेडेकर यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार आहे. वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्तही ठरलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कोकणात मनसेला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर?

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार आहेत. त्यांनी 2014 साली दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत इतकच नाही तर राज्यातील पहिली खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा पुढाकार होता ते खेडचे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. धडाडीचा आंदोलनातील थेट भिडणारा कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे. यापूर्वी त्यांचा संघर्ष हा थेट त्यांचे राजकीय गुरू शिवसेना नेते रामदास कदम यांच्याबरोबर राहिला आहे पण अलीकडे हा संघर्ष निवळला आहे. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची मोठी क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्यसरचिटणीस कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या भाजपा पक्षप्रवेश विषयाची चर्चा सध्या सुरू झाली आहे असं झाल्यास मनसेला मोठा धक्का कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *