चिपळूण : एसटीतून फेकल्या गेलेल्या प्रवाशी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

banner 468x60

गुहागर-गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडून बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रियंका विनोद कुंभार (वय ३५, रा. दहिवली-कुंभारवाडी) यांचे मंगळवारी (२१ ऑक्टोबर) निधन झाले.

banner 728x90

अपघातानंतर चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रियंका यांनी गेले तीन दिवस जीवन-मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर मध्यरात्री सोडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने दहिवली परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर ते रत्नागिरी या मार्गावरील एस.टी. बसमधून प्रियंका कुंभार आणि त्यांच्यासोबत सविता करंजेकर या रविवारी ( १९ ऑक्टोबर ) दहिवली खुर्द येथील आंबाफाटा थांब्यावरून सावर्डे येथे प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बस एका खड्ड्यात आदळल्यामुळे बसचा आपत्कालीन दरवाजा अचानकपणे उघडला. यामुळे प्रियंका कुंभार या दरवाजातून थेट बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली.


तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेले तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताप्रकरणी यापूर्वीच सावर्डे पोलीस ठाण्यात एस.टी. बसचा चालक आणि वाहक यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी दहिवलीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. तरुण महिलेच्या अपघाती निधनामुळे दिवाळीचा सण जवळ असतानाच कुंभार कुटुंबीयांवर व संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. प्रवासादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *