कोकण कट्टा न्यूजने आज एक बातमी “मंडणगड : पूल होण्याआधीच कोसळला; निकृष्ट कामामुळे जनतेचा पैसा पाण्यात कसा जातो ते पाहा” या मथळ्याखाली बातमी प्रकाशीत केली. कोकण कट्टा न्यूज कोकणातील एक विश्वासार्ह माध्यम म्हणून ही बातमी तातडीने मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर बांधकाम विभाग आणि गावातील सुजाण व्यक्तींनी आम्ह्यला संपर्क केला आणि याबाबत तथ्य माहिती सांगितली आहे.
मंडणगड तालुक्यातील लाटवण–पिंपळगाव (रामवाडी) येथील नदीवर उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाबाबत आज दिवसभर मोठी चर्चा रंगली. ही बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र या प्रकरणी बांधकाम विभागाने पुढे येत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून संबंधित पूल कोसळलेला नसून तो पाडण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता आकाश जाधव यांनी कोकण कट्टा न्यूजला याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, सदर पूल ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत नियोजनपूर्वक पाडण्यात आला. पुलाच्या बांधकामामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या. विशेषतः स्लॅब कास्टिंग योग्य पद्धतीने झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
प्राथमिक टप्प्यात पुलाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक पाहणी केली. या पाहणीत काही बाबी निकषांनुसार नसल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण रचना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, अर्धवट किंवा त्रुटीपूर्ण बांधकाम दुरुस्त करण्याऐवजी पूल पाडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, संबंधित पुलाचे काम पुन्हा नव्याने आणि योग्य तांत्रिक मानकांनुसार सुरू करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात कामाला सुरुवात होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी दर्जा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
pu
टीप : आम्ही एक जबाबदार आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून वाचकांसमोर नेहमीच अचूक, सत्य आणि पडताळणी केलेली माहिती सादर करण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची शहानिशा करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, आणि त्या तत्त्वाशी आम्ही कायम बांधील आहोत.
अलीकडे प्रसिद्ध झालेल्या आमच्या एका बातमीमुळे संबंधित यंत्रणेकडून तातडीने दखल घेत स्पष्टीकरण देण्यात आले. यामुळे केवळ त्या विषयाची वस्तुस्थिती अधिक स्पष्ट झाली नाही, तर पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याच्या प्रक्रियेला अधिक बळ मिळाले. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही संबंधित यंत्रणेचे तसेच आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या वाचकांचे मनापासून आभार मानतो.
वाचकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्याचबरोबर ही एक मोठी जबाबदारी देखील आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक बातमी अधिक जबाबदारीने, वस्तुनिष्ठतेने आणि सखोल पडताळणी करूनच प्रसिद्ध केली जाईल, याची आम्ही खात्री देतो. पारदर्शकता, सत्यता आणि लोकहित या मूल्यांना आम्ही सदैव प्राधान्य देत राहू.
आपल्या सततच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
कोकण कट्टा न्यूज
संपादकीय विभाग

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













