मंडणगड : घरफोडीचा 24 तासांत छडा, लाखांचा मुद्देमाल हस्तगत

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडी येथे झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मंडणगड पोलिसांना केवळ २४ तासांत यश आले आहे. या चोरीतील संपूर्ण मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या या वेगवान कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

banner 728x90

धुत्रोली हनुमानवाडी येथील सरस्वती सुखदरे (वय ७४) या वृद्ध महिलेच्या घरात घरफोडी झाली होती. या अज्ञात चोरट्याविरुद्ध १५ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनुसार, चोरट्याने घरातील ४ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे ३ लाख ३३ हजार रुपये आहे, तसेच १ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती.


गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तातडीने कामाला लागले. पोलिसांनी चोरी झालेल्या परिसराची कसून तपासणी करत संशयित व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी श्वान पथकालाही बोलावण्यात आले होते. बोटांचे ठसे आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी विनोद सुगदरे (वय ४०, रा. धुत्रोली) या मुख्य संशयिताच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले.


पोलिसांना आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्यामुळे आरोपी विनोद सुगदरे हा चोरीचा मुद्देमाल घरातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करत असतानाच, १७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला धुत्रोली येथील त्याच्या राहत्या घरातून रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी बाहेर फेकलेला चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि आरोपी अशा दोघांनाही ताब्यात घेऊन गजाआड केले. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

या यशस्वी तपास कार्यात तपास अंमलदार दत्ताराम बाणे, पोलीस नाईक संजय बारगुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संबंधदास मावची, पोलीस हवालदार विशाल कोळथरकर, गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील आणि पोलीस पाटील राकेश पोतदार, नूरहसन कडवेकर, रमेश जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. मंडणगड पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी एस. सणस यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणाच्या तपासाची सखोल माहिती घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *