मंडणगड : गरोदर मातेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णवाहिका चालकावर कारवाई

Screenshot

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील गरोदर माता विधी संदेश सावणेकर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाने १०२ रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकाला दोषी ठरवले आहे.

banner 728x90

या चालकावर योग्य ती कारवाई करावी, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.कुडुक बुद्रुक येथील विधी सावणेकर यांचा १० मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेच्या चौकशीसाठी कोल्हापूर येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालक स्तरावरील पथकाने ११ मे रोजी मंडणगडला

भेट देऊन तपास केला. या दरम्यान, त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. या चौकशीत असे निष्पन्न झाले की, १०२ रुग्णवाहिकेवरील चालकाने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही.

त्यामुळे गरोदर मातेला पुढील उपचारासाठी तातडीने हलवणे शक्य झाले नाही. वेळेत उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संबंधित रुग्णवाहिकेवर ओम साई स्वयंरोजगार सेवा, सहकारी संस्थेमार्फत चालकाची नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठ स्तरावरून या संस्थेला दोषी चालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मंडणगड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की, “देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेमधून रुग्णाला मंडणगड रुग्णालयात आणून दाखल केले. त्यानंतर ती रुग्णवाहिका परत गेली. मंडणगडमधून पुढील उपचारांसाठी रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. देव्हारे येथील रुग्णवाहिकेच्या चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो होऊ शकला नाही.

याच कारणामुळे रुग्णाला वेळेत उपचारासाठी नेता आले नाही, हे चौकशीत स्पष्ट झाले आहे. यात वाहनचालकाची स्पष्ट चूक आढळली आहे.” असं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *