मंडणगडमध्ये एसटी डेपोतच डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. एसटी बससाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधूनच डिझेल चोरी करण्याचा एक धक्कादायक प्रकार मंडणगड एसटी डेपोमध्ये उघडकीस आला आहे.
टँकर चालक आणि क्लिनरने संगनमत करून टँकरमध्ये एक छुपा कप्पा तयार केला होता आणि त्याद्वारे तब्बल ६१ लिटर डिझेल चोरल्याचे उघड झाले आहे. डेपो अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मंडणगड एसटी डेपोच्या आवारात घडली. डेपोसाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधील चालक आणि क्लिनरच्या संशयास्पद हालचालींमुळे डेपो अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी टँकरची पाहणी केली असता, एक धक्कादायक बाब समोर आली.
टँकर चालकाने टँकरच्या झाकणाच्या बाजूला छेडछाड करून एक अतिरिक्त वॉल बसवला होता. हा वॉल चालू करताच, टँकरच्या मुख्य टाकीतील डिझेल त्यांनी तयार केलेल्या एका गुप्त, तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. या अनोख्या पद्धतीचा वापर करून चालक आणि क्लिनर डिझेलची चोरी करत असल्याची खात्री पटताच, डेपो व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले.
याप्रकरणी डेपो अधिकारी मदनीपाशा बहाउद्दीन जुनेदी (वय ४७) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून टँकर चालक मोहन शामराव देवकत (वय ४०, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि क्लिनर शाहू भीमराव सूर्यवंशी (वय २७, रा. मिरज, जि. सांगली) या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५,४२५ रुपये किमतीचे ६१ लिटर डिझेल जप्त केले असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*