मंडणगड : लाखोंच्या खैरांची चोरी

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील देउलगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखो रुपये किमतीच्या ३५ खैर वृक्षांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही झाडे तोडून नेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

banner 728x90


ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. देउलगाव येथील शेतकरी सुधीर सीताराम सोंडकर यांच्या मालकीच्या मोरटोक येथील गट क्र. ६/१३ अ आणि ६/१३ ब मधील शेतीत ही झाडे होती. त्यांच्या शेतात एकूण १५० खैर वृक्षांपैकी तब्बल ३५ मोठी झाडे चोरट्यांनी कापून नेली. या झाडांची अंदाजे किंमत ४८,००० रुपये असून, ही चोरी लबाडीच्या इराद्याने करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


सुधीर सोंडकर यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून खैर वृक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे, त्यामुळे खैर लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या चोरीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शेतीत लागवड केलेल्या मौल्यवान वृक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *