मंडणगड : मानेवर कोयता ठेवून 2 लाखांच्या ऐवज लुटला, चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला

banner 468x60

मानेवर कोयता ठेवून तीन जणांनी एक घर लुटल्याचा प्रकार तालुक्यातील सडे मानेवाडी येथे घडला आहे. या घरफोडीत या चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा २ लाख ९१ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. मंडणगड पोलिस स्थानकात याबाबतची फिर्याद दाखल झाली आहे. या घटनेसंदर्भात फिर्यादी नंदकिशोर परशुराम माने (६५, रा. सडे मानेवाडी) यांनी दाखल केली आहे.

banner 728x90

९ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपून ते झोपी गेले. पहाटे २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेले तीन लोक माने यांच्या घराच्या स्वयंपाकघराच्या स्लायडिंग खिडकी सरकवून खिडकीच्या वाटेने घरात प्रवेश केला. खिडकी सरकवण्याच्या आवाजाने माने यांना जाग आली.

ते बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत असताना घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांचे हात व पाय टॉवलेच्या मदतीने बांधले आणि त्यांच्या मानेवर घरातील कोयता ठेवून ओरडण्याचा प्रयत्न केलास तर तुला ठार मारू, अशी धमकी दिली.

त्यानंतर चोरट्यांनी माने यांच्या तोंडावर चादर टाकून बेडरूममधील कपाटातील रोख २२ हजार रुपये व उशीखाली ठेवलेली २ लाख ३६ हजार रुपये किमतीची सुमारे चार तोळे सोन्याची चेन घेऊन तेथून पलायन केले. मंडणगड पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९ (४), ३०५, ३३१ (४), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.


शस्त्राचा धाक दाखवून चोरी झाल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्षांनी घडला आहे. जिल्ह्यात बंद घरात चोरी करण्याचे प्रमाणच अधिक आहे. त्यामीळे खळबळ उडाली आहे.घरमालक माने यांना जाग आल्याने चोरट्यांनी त्यांच्या मानेवर कोयता ठेवला. तो कोयता चोरट्यांनी त्याच घरातून घेतला होता, अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *