मंडणगड : घराला आग लागून 5.62 लाखांचे नुकसान

banner 468x60

मंडणगड शहरात शॉर्टसर्किटमुळे बुधवारी पहाटे ५ वाजता शिगवण कॉम्प्लेक्सशेजारील चाळीतील शबाना मन्सूर अहमद पोशीलकर यांच्या घराला आग लागली. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि चाळीतील अन्य घरांना वाचवण्यात यश आले.

banner 728x90

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे पोशीलकर यांच्या घराचे ५ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले. शहरातील शिगवण कॉम्प्लेक्सशेजारील पोशीलकर यांच्या घराला बुधवारी पहाटे आग लागल्याचे वृत्त कळताच, नगर पंचायत प्रशासनाला तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानुसार फायर फायटर डंकीसह नगर पंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे, विकास साळवी, संदीप डिके, प्रकाश करावडे, गणेश सापटे, महेश दळवी, तसेच पोलीस कर्मचारी, पोलीस

पाटील दत्तात्रय भोसले आणि महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि चाळीतील अन्य घरांना आगीपासून वाचवण्यात यश आले. महसूल अधिकारी मयूर पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, त्यात ५ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन किती सज्ज असते, हे दिसून आले. मंडणगडमध्ये अद्ययावत अग्निशमन यंत्रणेची गरज मंडणगड शहराचा विस्तार ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा झाला आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेता, नगर पंचायतीकडे स्वतःची अद्ययावत अग्निशमन यंत्रणा असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. नगर पंचायत स्थापनेला १० वर्षे झाली असली तरी ही व्यवस्था अजूनही उपलब्ध झालेली नाही.

नगर पंचायतीला महिनाभरापूर्वी मिळालेली एक फायर फायटर डंकी बुधवारी लागलेल्या आगीवेळी उपयोगात आली असली तरी, मोठ्या आगीच्या प्रसंगात तिच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता, बंब व अन्य आवश्यक यंत्रणा शहरात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

कारण तालुक्यात अशी व्यवस्था नसल्याने, लगतच्या खेड व दापोली येथील नगर पंचायतींवर यासाठी अवलंबून राहावे लागते आणि तेथून अग्निशमन यंत्रणा येण्यास किमान एक तासाचा कालावधी लागतो. वर्षभरात शहरातील आगीची ही दुसरी घटना असल्याने, यातून बोध घेऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *